✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:– अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. तसेच आयोगाच्या २०२२ च्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मा. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तसेच जिल्ह्य़ातील जनतेच्या वतीने आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवण्याचा प्रकारांना आळा बसेल आणि लोकशाही मूल्यांची गळचेपी होणार नाही असा विश्वास वाटतो. न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक असून जनतेच्या मताधिकाराचा सन्मान करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय मदत मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संस्थांच्या माध्यमातून होत असते. जनसामान्यांच्या रोजच्या जीवनातील समस्यांची जाणीव असलेले प्रतिनिधी येथे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. मात्र अनेक वर्षांपासून निवडणूका झाल्या नसल्याने तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडविण्यात प्रशासन कमी पडत असल्याच्या तक्रारी आहेत. आता या निर्णयाने सर्व सामान्य जनतेला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.


