योगेश मेश्राम चिमूर प्रतिनिधी*
चिमुर:-काश्मीरमधील पहलगाम परिसरात २३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण देश शोकाकुल झाला असून, या पार्श्वभूमीवर ग्रामगीता महाविद्यालय आणि समान संधी केंद्राच्या वतीने एका विशेष श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले, समान संधी केंद्राचे समन्वयक सरताज शेख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हल्ल्यात शहिद झालेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी बोलताना प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले म्हणाल्या, “देशाच्या अखंडतेला हादरवणाऱ्या अशा घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो. शहिद झालेल्या नागरिकांच्या बलिदानाची आठवण ठेवून आपल्याला देशासाठी एकजुटीने उभे राहिले पाहिजे.” त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, शांतता आणि सहिष्णुतेच्या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.
समान संधी केंद्राचे समन्वयक सरताज शेख यांनीही आपल्या भाषणात शोक व्यक्त करत, “हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले निष्पाप पर्यटक आपल्या देशाचेच आप्तस्वजन होते. अशा घटनांमुळे आपल्याला एकत्र येऊन देशविरोधी शक्तींना कठोर उत्तर देण्याची गरज आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी शहीदांना मानवंदना दिली आणि त्यांचा त्याग व बलिदान कायम स्मरणात ठेवण्याची प्रतिज्ञा केली. महाविद्यालयाच्या वतीने शहिदांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचा संदेशही देण्यात आला. हा श्रद्धांजली कार्यक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.









