आता गडचिरोली जिल्हयातच हेड पोष्ट ऑफीस होणार -खा. डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांना यश
संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, केंद्र सरकारने गडचिरोली येथे पोस्ट विभागाचे स्वतंत्र विभागीय कार्यालय आणि हेड पोस्ट ऑफिस स्थापन करण्यास अखेर मान्यता दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील नागरिक, अधिकारी आणि जनप्रतिनिधींची ही दीर्घकालीन मागणी होती. विशेषतः खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी सातत्याने या विषयासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा केला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे त्यामुळे आता चांदा हेड पोष्ट ऑफीस ची प्रतिक्षा संपणार असुन गडचिरोली जिल्ह्यातच मुख्य हेड पोष्ट ऑफीस होणार.गडचिरोली जिल्हा स्थापनेला सुमारे ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र आजतागायत येथे स्वतंत्र हेड पोस्ट ऑफिस किंवा पोस्टाचे विभागीय कार्यालय नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध टपाल सेवा, खात्यांशी संबंधित कामकाज, तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूरपर्यंत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ, खर्च आणि संसाधनांचा अपव्यय होत होता.केंद्र सरकारच्या संप्रेषण मंत्रालयाच्या टपाल संचालनालयाने महाराष्ट्र सर्कलच्या प्रस्तावास सैद्धांतिक मान्यता दिली असून, गडचिरोली एमडीजी (HSG-I) चे हेड पोस्ट ऑफिसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे आणि विद्यमान चंद्रपूर पोस्टल डिव्हिजनचे विभाजन करून नवीन गडचिरोली पोस्टल डिव्हिजन तयार करण्यात येणार आहे.या ऐतिहासिक निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आता पोस्टल सेवांसाठी चंद्रपूरकडे धाव घ्यावी लागणार नाही. जिल्ह्यातच सर्व सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामीण भागांपर्यंत योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होईल.खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करताना सांगितले की, “गडचिरोलीच्या विकासासाठी हे एक मोठे पाऊल आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या निर्णयामुळे जिल्ह्याला टपाल क्षेत्रात स्वतंत्र ओळख मिळेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

