राजेश येसेकर ✍️तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : गेल्या बावीस दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर निप्पान प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला दिनांक 14 रोज सोमवारला दुपारी तीन वाजता केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी भेट दिली व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर चर्चा केली असल्याचे निप्पाण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख लिमेश माणूसमारे यांनी कळविले. एमआयडीसीच्या चुकीमुळे येथील प्रकल्पग्रस्तांना गेल्या 25 वर्षांपासून रोजगारापासून वंचित राहून त्यांना त्रास सोसावा लागला असल्याचे यावेळी अहिर यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे हंसराज अहिर यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांना आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष प्रविण सातपुते, मधुकर सावनकर, सुधीर सातपुते, बंडू भादेकर, बापू सोयाम,तेजकरण बदखल, चेतन गुंडावार जगन दानव, रवी बोडेकर, बाबा तराळे, नानेबाई माथनकर, आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. निप्पान प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर सध्या दोन कंपन्यांच्या उभारणीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. आधी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवाव्या व नंतर कंपनीचे काम सुरू करावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. प्रति एकर दहा लाख रुपये अनुदान, नोकरीची हमी व त्रिपक्षीय करार या मागण्यांसाठी निप्पान प्रकल्पग्रस्तांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेले आहे. मात्र अद्याप प्रशासनाने व लोकप्रतिनिधीने याची दखल घेतली नसल्याची खंत व कैफियत संतप्त प्रकल्पग्रस्तांनी मांडली. यावर सकारात्मक पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

