जिल्हातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात युवक काँग्रेस होणार आक्रमक – शंतनू धोटे.
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :-एनडीए आणि महायुती सरकार च्या काळात देशात, राज्यात निर्माण झालेली अराजकता, गुंडाराज, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या समस्या, राजकीय गुन्हेगारी, शेतकऱ्यांवरील अन्याय यासह सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली येत्या १५ ते १९ मार्च या कालावधीत पुणे येथून मुंबईपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. यादरम्यान मुंबई विधानभवनाला घेराव, तसेच विविध उपक्रमातून जनसामान्यांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी दररोज मोठय़ा संख्येने सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्य़ात आरटीओ कार्यालयात व सिमा नाक्यांवर तसेच वाहन तपासणीत जनसामान्यांची प्रचंड लुट होत असून खाजगी ट्रान्सपोर्ट, परराज्यातील वाहनांची एंट्री फी, सिमा नाक्यावर आणि आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी होणारी अवैध वसुली विरोधात तसेच सर्वच विभागातील भ्रष्ट अधिकारांच्या विरोधात चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊन जनसामान्यांच्या न्यायासाठी संघर्ष करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सोबत युवक काँग्रेस चे राजीव खाजांची, जिल्हा उपाध्यक्ष गौतम पाटील, तालुका महासचिव हर्षल येलमुले, अमन ननावरे यासह चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर प्रहार :–
पत्रपरिषदेत आरटीओ च्या भोंगळ कारभारावर जोरदार हल्ला करतांना त्यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्हयातील महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट नाक्यावर साधारणपणे आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून एका ट्रक मागे ५०० रुपये वसूल करण्यात येते. याप्रमाणे दररोज ६०० ट्रक या नाक्यावरून जातात असा अंदाज बांधला तर एका दिवसाला ३ लाख रुपये याप्रमाणे एका महिन्याला किमान १ करोड रुपये हे ओव्हरलोड हे टि. डी तपासण्याच्या बहाण्याने वसुली करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात खनिज वाहतुकीमध्ये कोळसा, रेती, आयरन, लाईन स्टोन, गिट्टी, लॅटराईट, मुरूम असे विविध प्रकारच्या खनिजांची ओव्हरलोड वाहतूक तसेच चोरोटी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे सर्व सुरू आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक ओव्हरलोड ट्रक ला २०० रुपये अवैध वसुली करण्यात येते. अशा दिवसाला जवळपास १ हजार च्या वर ओव्हरलोड ट्रक ये जा करतात असे गृहीत धरले तर २ लाख रुपये एका दिवसात याप्रमाणे महिन्याला ६ लाख रुपये अवैध वसुली होते असा अंदाज आहे. विशेष बाब म्हणजे यात क्षमतेपेक्षा अधिक वजनामुळे रस्त्यांचे अतोनात नुकसान होत असून रस्ते खचून जातात, ट्रक टिप्पर चे ब्रेक लागत नाही, त्यामुळे अपघात होतात अनेक निष्पाप लोकांचे जीव जातात, अशा निष्याप पिळीत कुटुंबीयांना आरटीओ कडून कुठल्या प्रकारची मदत वेळेवर मिळते तसेच हे सगळे होत असताना आरटीओ कडून कुठली कार्यवाही करण्यात येते हा संशोधनाचा विषय आहे. आरटीओ किरण मोरे हेच या सर्वांसाठी जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
सामान्य लोकांची
लूट :- आरटीओच्या माध्यमातून मोठे मासे सोडून छोट्या माशांवर कारवाई होताना आपण दररोज बघतो. त्यामध्ये ट्रिपल सीट, हेल्मेट नसणे, कागदपत्रे जवळ नसणे, कागदपत्रांची पूर्तता नसणे अशा विविध कारणास्तव वाहन चालकांना थांबवून त्यांचे वर कार्यवाही करण्यात येते. यात सुद्धा अनेकदा सामान्य माणसाची लूट होताना दिसते. मात्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेली जड वाहतूक यावर मात्र आरटीओ चे अधिकारी आणि हा विभाग चिरीमिरी घेऊन पांघरून घालताना दिसते. आरटीओ च्या माध्यमातून दुचाकी, चारचाकी वाहन चालकांची जनजागृती करण्यासाठी किती कॅम्पचे आयोजन केले जाते आणि काय प्रकारची जनजागृती केली जाते याचासुद्धा तपास घेण्याची गरज आहे. कारण या अभावी सुद्धा जनसामान्यांची मोठी लूट होताना दिसते.
तर राज्य सरकारने एच. एस. आर. पी. नंबर प्लेट साठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यातही काही दलाल व व्यावसायिक जनतेची लूट करीत आहेत. एकंदरीत आरटीओ विभातील संपूर्ण विभागाची कसून चौकशी करण्यात आल्यास या विभागात जवळपास ५ ते १० कोटी रुपयांची अवैध कमाई अधिकारी व त्यांच्या हाताखाली दलाल व व्यवसायीक करीत आहेत. या सर्वांसाठी मोरेची निष्क्रियता कारणीभूत असून यांच्यावर तसेच यांच्या भ्रष्ट सहकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

