नागरिकांची फसवणूक; चौकशीची मागणी
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-शासनाने गोरगरिबांना मोफत भांडी पेटी वाटप करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे योग्य नियोजन देखील करण्यात आले आहे. मात्र, कोरपना तालुक्यात एका महिलेने बांधकाम विभागाची अधिकृत व्यक्ती असल्याचा बनाव करून नागरिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
संबंधित महिलेने घरोघरी जाऊन, “मी बांधकाम विभागातून आहे, तुम्हाला पेटी मंजुरीसाठी अर्ज भरायचा आहे का? मी तुम्हाला मंजुरी मिळवून देईन, पण त्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील,” असे सांगितले. अनेक गरजू नागरिकांनी या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे दिले. मात्र, काहींना पेटी मंजूर झाली, तर काहींना पैसे देऊनही कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

यासंदर्भात आता नागरिकांकडून संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बांधकाम विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
