प्रशासनाचे दुर्लक्ष: मोहीम राबवून अतिक्रमण मुक्त करण्याची गरज
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-तालुक्यात असलेल्या अनेक गावातील गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने गावाच्या भविष्यातील विकासासाठी आवश्यक असलेल्या जागांचा वापर होऊ शकत नाही.
गायरान जमिनींवर जनावरांचे गोठे, शेतमालाचे साठवणगृह, वस्ती, शेंदेखताचे ढीग तसेच अनधिकृत घरे उभारण्यात आली आहेत. परिणामी, गावासाठी नियोजित असलेली शासकीय कार्यालये , शाळा ,आरोग्य केंद्र, क्रीडांगण, बगीचा, तलाव, पाणी पुरवठा योजना,वाचनालय, व्यायामशाळा आणि रोपवाटिकांसाठी जागा उरत नाही.
गावाच्या विकासासाठी या गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त करून त्यांचा सुयोग्य वापर केला पाहिजे. या जमिनींवर सार्वजनिक उपयोगाच्या सुविधा निर्माण केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळेल. गावांमध्ये मैदाने, बगीचे, व्यायामशाळा आणि जलसंधारण प्रकल्प उभारल्यास युवकांच्या विकासासह पर्यावरण रक्षणासही हातभार लागेल.
अनेक वेळा स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे बऱ्याच गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तालुक्यात ही समस्या जवळपास ११३ ही गावात आवसुन उभी आहे.
संरक्षण भिंत बांधण्याची मागणी
गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त केल्यानंतर त्याभोवती संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा अतिक्रमण होण्यास आळा बसेल आणि गावाच्या विकासासाठी ही जमीन सुरक्षित राहील.
प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत

गायरान जमिनींच्या अतिक्रमणावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावून ही जागा सार्वजनिक हितासाठी राखीव ठेवावी, अतिक्रमित भागातील रस्ते नियोजित करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
