तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर.

राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती. : प्रकल्पग्रस्तांना प्रति एकर दहा लाख रुपये अनुदान द्यावे, अडीच एकरामागे एक नोकरी द्यावी व एमआयडीसी, प्रकल्पग्रस्त आणि कंपनीमध्ये त्रिपक्षीय लेखी करार करण्यात यावा या प्रमुख मागण्यांना घेऊन अन्य मागण्यांसाठी निप्पान प्रकल्पग्रस्तांनी काढलेला विशाल मोर्चा आज दिनांक 17 ला भद्रावती तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला सादर करण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांसोबत आपल्या विविध मागण्यांवर चर्चा केली. निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे शहरातील भद्रनाग मंदिर प्रांगणातून प्रकल्पग्रस्तांच्या विशाल मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा शहरातील मुख्य रस्ता, हायवे असा होत भद्रावती तहसील कार्यालयावर धडकला.निप्पान डेन्रो प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या ढोरवासा परिसरातील जमिनीवर येऊ घातलेल्या ग्रेटा कंपनीसाठी शासनातर्फे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व मागण्या मार्गी न लावता काम सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यात येत नाही तोपर्यंत सदर काम बंद ठेवावे अशी प्रकल्पग्रस्तांची भूमिका आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता सदर कंपनीचे काम सुरू करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये शासन विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्याचीच परिणीती म्हणून निप्पान प्रकल्पग्रस्त समितीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सदर मोर्चात लिमेश माणूसमारे, सुधीर सातपुते, प्रवीण सातपुते, सुरेश बदखल, बापूराव सोयाम,रवि बोडेकर, चेतन गुंडावार,संदिप कुटेमाटे, बंडु भादेकर , जगन दानव,तेजकरण बदखल, मधुकर सावणकर, अनुप खुटे माटे,सौ. जयश्री ठाकरे, नाणेबाई माथनकर,आदिंसह महिला तथा पुरुष प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या या मोर्चाला व मागण्यांना शिवसेना शिंदे गट, तालुका सरपंच संघटन व कैम्युनीष्ट पक्षातर्फे समर्थन देण्यात आले आहे.
