✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-कोरपना तालुक्यात अवैध दारू विक्री आणि सट्टा पट्टीच्या वाढत्या प्रमाणामुळे समाजात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा, असे स्पष्ट निर्देश आमदारांनी पोलिस प्रशासनाला दिले. तालुका स्तरावरील विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना दिली.
गेल्या काही काळात कोरपना तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री आणि सट्टा पट्टीचे अड्डे वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत आहेत.
अवैध दारू विक्री व सट्टापट्टीमुळे स्थानिक युवक व्यसनाधीन होत असून, समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. बैठकीत आमदारांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेतली आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.
बैठकीत आमदारांनी पोलिस अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला. तालुक्यात कोणत्या गावांमध्ये अशा बेकायदेशीर गोष्टी सुरू आहेत, त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांनी तपास करून तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी सूचना त्यांनी केली. “अवैध व्यवसायांमुळे केवळ युवकांचेच नाही, तर संपूर्ण कुटुंबांचे नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे,” असे आमदारांनी ठामपणे सांगितले.
बैठकीदरम्यान, उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लवकरच कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
तालुक्यातील नागरिकांनी अशा गैरप्रकारांविरोधात पुढाकार घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून समाजातील युवकांना योग्य मार्गावर आणता येईल. पोलिस विभागानेही नियमित गस्त वाढवून अशा अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणावे, असे निर्देश आमदार देवराव भोंगळे यांनी पोलीस विभागाला दिली आहे त्यामुळे आता अवैध धंद्यावर आळा बसणार काय याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे
