✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा:– इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हाय स्कूल राजुरा येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोज गुरुवारला ‘ मराठी राजभाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिवस तसेच सुप्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर जयंतीचे औचित्य साधून कवी शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांनी सकाळच्या परिपाठाचे सादरीकरण केले. वर्गशिक्षिका ममता पुरटकर यांनी या दिवसाचे महत्त्व सांगून प्रास्ताविक केले तसेच कु.नंदिनी केंद्रे हिने मराठी भाषा दिनावर आधारित सुविचार सांगितला. तर कु.वीरा उल्लेवार हिने ठळक बातम्या सांगून दिवसाच्या घडामोडींची माहिती दिली तर कुमार एकांश त्रिशुलवार ह्याने दिनविशेष सांगितले. तसेच कु. ईश्वरी बोबडे हिने “मराठी भाषा” दिनाबद्दल उत्तम माहिती सांगितली तर काही विद्यार्थ्यांनी सामूहिक सुमधुर गीत गाऊन सकाळचे वातावरण अधिक मनमोहक केले तर कु. चैताली पेटकर हिने कवितेचे गायन केले. मराठी भाषेच्या विकासाला व प्रसाराला चालना मिळावी या दृष्टिकोनातून काही विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये म्हणून या दिवसाचे विशेष महत्त्व पटवून दिले तर परिपाठाच्या अंतिम टप्प्यात कु. आशुराज पांडे व कु. गुंजन खनके ह्यांनी ‘मराठी भाषा दिनावर’ आधारित काही प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घातली.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी उल्लेवार व कु. अंशिका बट्टे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
