✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
9421734792
गडचिरोली:-अंतर्गत लेखापरीक्षण हे प्रामुख्याने झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी पतसंस्थांना मिळालेली संधी असते म्हणून नागरी पतसंस्थांनी प्रामाणिकपणे निष्पक्ष लेखापरीक्षक नेमून आपल्या पतसंस्थेचे अंतर्गत लेखा परीक्षण करावे झालेल्या चुकांची दुरुस्ती करावी आणि भविष्यात चुका होणार नाही याची दक्षता घेतल्यास अशा पतसंस्था कधीच बुडीत निघणार नाही त्या सतत प्रगतीपथावरच असेल असे मोलाचे मार्गदर्शन गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी गडचिरोली
पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ मर्यादित गडचिरोली, सहकार भारती व सहकार विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त आयोजित जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांसाठी शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूल गोकुलनगर येथे ८ व ९ मार्च या दोन दिवशीय सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदर्भ को ऑप फेडरेशन लिमिटेड अमरावती चे उपाध्यक्ष तथा दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था चे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील खेवले, मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर, दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सुमतीताई मुनघाटे, मानद सचिव सुलोचनाताई वाघरे, प्रमुख मार्गदर्शक सहकार तज्ञ एडवोकेट प्रशांत शिर्के नागपुर, युवा नेते रजनीकांत मोटघरे आदी मंचावर उपस्थित होते. डॉ किरसान पुढे म्हणाले की, पतसंस्थेच्या प्रगतीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, तसेच पतसंस्थेत लोकांचे पैसे असतात ते विश्वासाने टाकले असतात तो विश्वास कायम ठेवण्यासाठी संचालकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे व संस्थेला प्रगतीपथावर न्यावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री म्हणाले की, काही पतसंस्था त्यांचे अंतर्गत बेकायदेशीर कारभारामुळे डबघाईस आलेल्या आहेत त्यामध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे लटकले आहेत म्हणून ठेवीदारांनी ठेवी ठेवतांना त्या पतसंस्थेची पत पाहूनच ठेवी ठेवाव्यात तसेच पतसंस्थांना प्रगती करायची असेल तर मार्केटिंग शिवाय पर्याय नाही नवीन ग्राहक मिळवणे व त्यांना टिकवून ठेवणे हे मार्केटिंगचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ते त्यांनी साध्य करावे. प्रमुख अतिथी पदावरून बोलताना संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील खेवले म्हणाले की, पतसंस्थेची प्रगती ही सहकार खात्याच्या कायद्याच्या चौकटीत राहूनच करता येते, त्यासाठी पतसंस्थेच्या संचालकांनी व कर्मचाऱ्यांनी सहकार प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आज महाराष्ट्रात 16000 सहकारी नागरी पतसंस्था पैकी सरकारी आकडेवारीनुसार 2008 पतसंस्था अवसायनात निघाल्या आहेत, यामागे जशा पतसंस्था कारणीभूत आहेत त्याचप्रमाणे सहकार खाते सुद्धा कारणीभूत आहे सहकार खात्याचे पतसंस्थावर नियंत्रण नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे . म्हणून राज्य पतसंस्था फेडरेशन व जिल्हा पतसंस्था फेडरेशन ची शासनाकडे मागणी आहे की, फेडरेशनला पतसंस्था वर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळावेत, दर दहा वर्षांनी शासनाने सहकारी कायद्यात बदल करावेत, पतसंस्थांचे डिजिटलायझेशन करावेत, आणि बुडीत निघालेल्या पतसंस्थेवर प्रशासक नेमताना योग्य कार्यतत्पर प्रशासकाची नेमणूक करावी त्यासाठी सहकार खात्याने संबंधित जिल्हा फेडरेशनला विचारात घ्यावे अशा प्रकारची मागणी संघाचे मानद सचिव प्रा शेषराव येलेकर यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातून शासनाला केली.
या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन शाखा व्यवस्थापक भूषण रोहनकर यांनी केले तर आभार संघाचे व्यवस्थापक भास्कर नागपुरे यांनी मानले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ संचालक प्रा. मधुकर कोटगले, पंडित पुडके, दिलीप उरकुडे, किशोर मडावी, पांडुरंग चिलबुले,दादाजी चुधरी, व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे तथा जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

