🚨सीबीआय तसेच ईडी मार्फत त्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी : कॉम्रेड राजू गैनवार
राजेश येसेकर✍️तालुका प्रतिनीधी भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील पिपरी रेती घाट प्रकरणापासून तहसीलदार राजेश भांडारकर हे तहसील कार्यालयात नियमित हजर राहत नसल्याने नागरिकांची अनेक कामे अडून पडली आहेत. या रेतीचोरी प्रकरणातील आरोपींनीच तहसीलदार यांना आम्ही पैसे देतो. त्यामुळे आपण कारवाई करणारे कोण? असा प्रश्न महसूल विभागाच्या लहान कर्मचाऱ्यांना केल्याने खळबळ माजली होती. या प्रकरणात तहसीलदारांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने ते नियमितपणे कार्यालयात येत नसल्याचा आरोप आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. तालुक्यात अनेक गौण खनिजांचा मोठा साठा आहे. वर्धा नदीसह अनेक लहान मोठे नाले आहेत. तालुक्यात खूप प्रमाणात रेती आहे. राळेगाव रीठ हा एकमेव घाट शासनाने एसएसएम या कंपनीला औष्णिक विद्युत केंद्र ऊर्जानगरला रेती पुरवठ्यासाठी दिला आहे. त्याचा कार्यकाल जून २०२५ मध्ये संपुष्टात येईल. या घाटा व्यातिरिक्त जेना,पिंपरी, कुनाडा, कोंढा, चारगाव, चिरादेवी आणि इतर लहान मोठे घाट आहेत. या ठिकाणावरून जेसीबी, हायवा, ट्रॅक्टर द्वारा दिवस-रात्र रेतीची उचल होत आहे. या माध्यमातून तहसीलदार भांडारकर यांनी चांगलीच माया जमवली आहे. या कामासाठी त्यांनी आपल्या कार्यालयातील काही मंडळ अधिकारी, तलाठी यांना कामी लावले आहे. तसेच बाहेरील एक व्यक्ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी नियुक्त केला आहे. दि.६ एप्रिलला गुप्त माहितीच्या माध्यमातून काही तलाठी आणि पोलीस पाटील यांनी पिंपरी घाटावर धाड टाकली.त्या ठिकाणी ट्रॅक्टर द्वारा रेतीची उचल होत असल्याचे आढळले. त्यांनी अटकाव केला असता आम्ही तहसीलदारांना पैसे देतो आपण कारवाई करणारे कोण?असा प्रतीप्रश्न केला. यावरून ते सर्वच अवाक झाले. यावेळी रेती तस्करांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला सुद्धा केला.या घटनेची माहिती त्यांनी तहसीलदार यांना दिली. पण यांनी त्यांनाच फैलावर घेतले. आपल्याला तिथे जावयास कुणी सांगितले असा प्रतिप्रश्न केला. घटनेची माहिती बातमीपत्र आल्यानंतर वरिष्ठांकडून विचारणा झाल्यावर पोलिसात तक्रार करण्यात आली.
यावरून तहसीलदार भांडारकर यांचे अवैध रेती चोरट्यांसोबत मधुर संबंध असल्याचे सिद्ध होते. भांडारकर यांच्या संपत्तीची चौकशी सीबीआय तसेच इडीच्या मार्फत करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी काम्रेड राजू गैनवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारीवर्गाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

