✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-आर्य वैश्य (कोमटी) समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी मधील इतर जात संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे आज राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य गडचिरोली दौऱ्यावर आले असता राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची भेट घेतली. आर्य वैश्य (कोमटी) समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने आयोगाला व जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिले. कोमटी समाज हा सधन समाज म्हणून ओळखला जातो. या समाजात बेरोजगार, मजूर, शेतमजूर, पानपट्टी चालक, भाजीविक्रेते, लहान दुकानदार ,बेघर, अल्पभूधारक, आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंब नाहीत. 1992 पासून कोमटी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कधीच प्रयत्न झाले नाही आता राजकीय वजन वापरून हा समाज ओबीसीत समाविष्ट करण्याचा आणि मूळ ओबीसींच्या राजकीय क्षेत्रातील ओबीसींच्या हक्काच्या जागा बळकवण्याचा प्रयत्न करीत आहे. असे ओबीसी शिष्टमंडळाने आयोगाला सांगितले. ओबीसी महासंघाची बाजू ऐकून घेण्यासाठी सुनावणीच्या वेळी आयोगाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला पाचारण करावे असे विनंती सुद्धा यावेळी आयोगाला करण्यात आली यावेळी शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी यांनासुद्धा निवेदन दिले आणि आमचे मागणी शासनापर्यंत पोहोचवावी अशी विनंती त्यांना केली. सरकार वारंवार ओबीसी समाजाचा अंत का पाहते ? खुल्या प्रवर्गातील काही जाती आपल्या राजकीय व शैक्षणिक अस्तित्वासाठी ओबीसी प्रवर्गात अतिक्रमण करीत आहे यासाठी आयोगाने किंवा शासनाने जर ओबीसी वर अन्याय केला तर संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज पेटून उठेल असा इशारा महासंघाच्या वतीने शासनाला देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, प्रा. देवानंद कामडी, सचिव सुरेश भांडेकर , कोषाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, मार्गदर्शक गोविंदराव बानबले , जिल्हा संघटक चंद्रकांत शिवणकर, घनश्याम जक्कुलवार,राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मस्के, जिल्हा युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महेंद्र लटारे,आदी उपस्थित होते.
